आज प्रत्येक मशिन शॉपमध्ये ‘मेटल आर्क डिसइंटिग्रेटर‘ किंवा ‘स्पार्क इरोजन मशिन’ असावे अशी गरज तयार झाली आहे. त्याला कारणेही तशीच आहेत.
या मशिनची सुरुवात कशी झाली हे पाहणे अत्यंत मनोरंजक ठरेल. 1966 साली एका स्क्रॅप डीलरकडे एक मशिन आले होते. ते तसेच पडून होते. हे मशिन काय आहे हे कोणालाच कळत नव्हते. दिसायला तर ते ड्रिलिंग मशिनसारखेच दिसत होते, पण स्पिंडलचा पत्ता नव्हता. त्या मशिनवर प्रिंटेड सर्किट बोर्ड दिसत होते. काही लोकांना कल्पना होती की, माझ्या वडिलांना इलेक्ट्रॉनिक्सबद्दल माहिती आहे म्हणून ते आमच्याकडे आले. माझ्या वडिलांनासुद्धा ते मशिन काय आहे हे त्यावेळी कळले नाही. पण त्यांनी त्या मशिनचा अभ्यास करून 3 ते 4 महिन्यांत ते मशिन चालू केले. पण हे मशिन कोणत्या कामासाठी वापरायचे हे कळले नाही. मग त्यांनी अमेरिकेतील त्यांच्या मित्राला संबंधित मशिनचा फोटो पाठवून त्याविषयी माहिती विचारली.आलेल्या माहितीवरून त्या मशिनचे नाव ‘स्पार्क एक्स्ट्रॅक्टिंग मशिन’ असे होते. माझ्या वडिलांच्या मित्राने त्याबद्दलचा एक लेखदेखील पाठविला. त्यावरून हे मशिन काय काम करते त्याचे आकलन झाले आणि त्याच अनुषंगाने माझ्या वडिलांनी स्वतः एक नवीन मशिन बनविले. हे मशिन जानेवारी 1968 मध्ये कार्यान्वित झाले.
मेटल आर्क डिसइंटिग्रेटर
सुरुवातीला हे मशिन आम्ही स्वतःकडेच घरात ठेवले, कारण त्यावेळी आमचे वर्कशॉप नव्हते. हे मशिन जॉब वर्क करण्यासाठी वापरायला सुरुवात केली. टॅपिंग करताना बऱ्याच वेळेला टॅप कार्यवस्तूमध्ये अडकतो आणि तो तुटतो. अशावेळी साहजिकच ती कार्यवस्तू फेकून द्यावी लागते. अशावेळी तो टॅप काढण्यासाठी या मशिनचा वापर सुरू केला. हे काम करण्यासाठी बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या आमच्याकडे कार्यवस्तू पाठवू लागल्या.
दरम्यान टाटा मोटर्सने असेच एक मशिन अमेरिकेहून मागविले असल्याचे आम्हाला कळाले. आम्ही टाटा मोटर्सला कळविले की, आम्ही अशाप्रकारचे संपूर्ण भारतीय बनावटीचे मशिन बनविले आहे. तुम्ही तुमच्या कार्यवस्तू आमच्याकडे जॉब वर्कसाठी पाठवू शकता. जर हे काम व्यवस्थित होत आहे असे वाटले तर तुम्ही हे मशिन विकत घेऊ शकता. काही नमूना यंत्रभाग आमच्याकडे करून बघितल्यानंतर टाटा मोटर्सने आमचे पहिले मशिन विकत घेतले. हे कळाल्यावर बजाज ऑटोनेदेखील आमच्याकडून हे मशिन विकत घेतले. अशाप्रकारे 1968 साली दोन मशिन विकून आम्ही श्रीगणेशा केला. यामुळे आम्हाला 1969 साली भारत सरकारने ‘इम्पोर्ट सब्स्टिट्युशन पुरस्कारा’ने गौरविले. 1971 साली आम्हाला याच मशिनसाठी पारखे पुरस्कारदेखील मिळाला आहे.
1971 ते 1983 या काळात आम्ही 300 मशिन भारतभर विकली. 1983 साली आम्ही काही वेगळी मशिन बनवू लागलो. याच काळात आम्ही या मशिनचे नाव ‘मेटल आर्क डिसइंटिग्रेटर’ (चित्र क्र. 1) असे ठेवले. इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि याप्रकारच्या मशिनला असलेली मागणी लक्षात घेऊन आम्ही या मशिनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करू लागलो. ग्राहकाच्या बदलत्या मागण्या/गरजा याला अनुसरून मशिनमध्येसुद्धा बदल करत गेलो. पूर्वी नुसतेच तुटलेले टॅप किंवा ड्रिल काढणे अशी अपेक्षा होती. आता मात्र मोठमोठ्या शिपमधील गंजलेले बोल्ट काढणे यासाठीसुद्धा या मशिनला मागणी येऊ लागली. त्यामुळे ‘मेटल आर्क डिसइंटिग्रेटर म्हणजे स्पार्कोनिक्स’ असे जणू समीकरणच तयार झाले. अशाप्रकारे आमचा ब्रँड तयार झाला.
मशिन कसे चालते?
EDM तंत्रज्ञानाचा शोध रशियामध्ये 1962 ते 1965 च्या दरम्यान लागला. या तत्त्वाचा उपयोग करून ‘मेटल आर्क डिसइंटिग्रेटर’ मशिनचा जन्म झाला. तुटलेले टूल काढण्यासाठी तुटलेला टॅप आणि मशिनमधील इलेक्ट्रोड यामध्ये विद्युत ठिणगी (इलेक्ट्रिक स्पार्क) तयार केली जाते आणि त्या उष्णतेमुळे तुटलेल्या ड्रिल/टॅपचे बारीक बारीक तुकडे म्हणजेच चुरा केला जातो. म्हणूनच या मशिनला ‘मेटल आर्क डिसइंटिग्रेटर’ असे नाव दिले आहे.
हे मशिन वापरण्यास अतिशय सुलभ आणि सुरक्षित आहे. कुठल्या टॅपसाठी कुठला इलेक्ट्रोड वापरायचा याचा तक्ता मशिनवर दिलेला असतो. या तक्त्यानुसार जर योग्य इलेक्ट्रोड वापरला तर काम अचूक होते. उदाहरणार्थ, M12 टॅपसाठी 7 मिमी.चा इलेक्ट्रोड, M10 टॅपसाठी 6 मिमी. चा इलेक्ट्रोड वापरावा. ही माहिती मशिनवर उपलब्ध करून दिलेली असते.
कार्यवस्तू मशिनच्या टेबलवर व्यवस्थित साफ करून ठेवली जाते. ज्या भोकातील तुटलेला टॅप काढावयाचा आहे ते भोक व इलेक्ट्रोडचे सेटिंग करून त्यांना समकेंद्रित केले जाते. आता मशिन चालू करून इलेक्ट्रोड पुढे पुढे सरकवत उत्पन्न झालेल्या ठिणग्यांमुळे तुटलेला टॅप जाळून नाहीसा केला जातो.
अशाप्रकारे केवळ जिज्ञासेपोटी आणि योगायोगाने जे मशिन समोर आले, त्याच मशिनचा उद्योग आज नावारूपाला
आला आहे.
मशिनचे विविध उपयोग
हे मशिन नेहमीच्या उत्पादनाशी निगडित नाही पण याची उपयुक्तता मात्र अद्वितीय आहे. समजा एखाद्या क्रँकशाफ्टमध्ये ड्रिल किंवा टॅप तुटला तर आणि आपण जर ते टूल व्यवस्थितपणे बाहेर काढू शकलो, तर तो क्रँकशाफ्ट वाचवू शकतो. म्हणजेच एका तुटलेल्या ड्रिलमुळे वाया जाणारा हजारो रुपयांचा क्रँकशाफ्ट वाचवू शकतो. अशा या उपयुक्त मशिनमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परतावा लगेचच वसूल होतो.
बऱ्याच ग्राहकांनी या मशिनचा उपयोग कठीणता आणि जाडी जास्त असलेल्या कार्यवस्तूमध्ये खाच (स्लॉट) करण्याकरितासुद्धा केलेला आहे. अर्थात या खाचांना फार अचूकतेची गरज नव्हती. एकदा BHEL कंपनीच्या 10 मीटर उंच बॉयलरमध्ये एक फाइल तुटून अडकली होती. तेव्हा आमचे पोर्टेबल मशिन क्रेनच्या साहाय्याने बॉयलरमध्ये नेऊन आणि त्याचा वापर करून या फाइलचा चुरा करून बाहेर काढण्यात यश आले. हे मशिन कुठल्याही कार्यवस्तूवर बसवून काम करता येते.
जेव्हा कार्बाइड टॅपचा वापर सुरू झाला तेव्हा टॅप तुटण्याचे प्रमाण कमी झाले. परंतु, टॅप तुटलाच तर तो नेहमीच्या पद्धतीने काढणे अशक्य झाले. उदाहरणार्थ, तुटलेल्या टॅपला रॉड वेल्ड करून टॅप काढणे शक्य नव्हते. जिथे जिथे कार्बाइड टॅपचा वापर सुरू झाला तिथे तिथे या मशिनला पर्यायच राहिला नाही. जोपर्यंत ड्रिल आणि टॅपचा वापर सुरू आहे तोपर्यंत या मशिनचा वापर अपरिहार्य होय.
खडकामध्ये भोक करण्याकरिता जे टूल (चित्र क्र. 2) वापरले जाते त्यावर कार्बाइड बटणे असतात आणि काही काळाने त्यांची झीज झाल्यामुळे ती काढून नवीन बसवावी लागतात. ही बटणे प्रेसफिट बसवून ब्रेझ केलेली असतात. ही बटणे काढण्यासाठी या मशिनचा वापर केला जातो. बंगळुरुमध्ये एका कंपनीने फक्त याच कामासाठी मशिन घेतले आहे आणि ते जॉबवर्कसुद्धा करतात. मोठ्या मशिनच्या मानाने छोट्या मशिनला तुटलेले टूल काढण्यास जास्त वेळ लागतो.
उपलब्ध पर्याय
सध्या आम्ही सुमारे 300 ते 350 वेगवेगळ्या प्रकारची मशिन बनवितो त्यात ‘मेटल आर्क डिसइंटिग्रेटर’ मशिनचा वाटा 30 ते 40 मशिनचा असतो. याचे उत्पादन थोडेसे कमी झालेले आहे. त्याला तीन कारणे आहेत.
1. एका शॉपमध्ये हे एकच मशिन पुरेसे असते.
2. या मशिनचे आयुष्य 30 वर्षांपर्यंत आहे.
3. पोर्टेबल मशिन वेगवेगळ्या जागी वापरता येते. त्यामुळे कार्यवस्तू मशिनजवळ नेण्याची गरज पडत नाही.
आम्ही 3 वेगवेगळ्या क्षमतेची ‘मेटल आर्क डिसइंटिग्रेटर’ मशिन बनवितो.
1. पॉवर 03 KVA, इलेक्ट्रोड हालचाल 150 मिमी.
2. पॉवर 10 KVA, इलेक्ट्रोड हालचाल 200 मिमी.
3 पॉवर 20 KVA, इलेक्ट्रोड हालचाल 250 मिमी.
या नवीन मशिनची किंमत साधारणपणे 4.5 ते 6.5 लाखांपर्यंत आहे. त्यामुळे छोटे कारखानदार हे मशिन घेत नव्हते. परंतु, आता त्यांना या मशिनची उपयुक्तता लक्षात आल्याने त्यांच्याकडूनसुद्धा आम्हाला मागणी होत आहे. कारण बरेच जण हे मशिन जॉबवर्क करण्यासाठी वापरू लागले आहेत. उदाहरणार्थ, हार्ड प्लेटवर तसेच नायट्रायडिंगचे लेपन केलेल्या कार्यवस्तूवर स्क्रूसाठी भोक आणि त्याचे काउंटरबोअर करणे शक्यच नाही. या परिस्थितीत केवळ या मशिनचाच पर्याय उपलब्ध आहे.
या क्षेत्रात 6 मिमी. ते 12 मिमी. या रेंजमध्ये मशिन बनविणाऱ्या साधारणपणे 10 ते 12 कंपन्या आहेत. पण 6 मिमी. ते 40 मिमी. रेंजच्या मशिनसाठी जगभरात 1 ते 2 कंपन्या आहेत.त्यामुळे या क्षेत्रात आम्हाला फारशी स्पर्धा नाही. परंतु तरीसुद्धा आम्ही ग्राहकांच्या बदलत्या गरजांचा नेहमीच विचार करतो आणि त्याप्रमाणे आम्ही सातत्याने मशिनमध्ये बदल करत असतो.
उदाहरण
पुण्यातील अल्ट्रा इंजिनिअर्स या कंपनीमध्ये ‘मेटल आर्क डिसइंटिग्रेटर’हे मशिन वापरात आहे. ‘अल्ट्रा’चे चंद्रकांत थोरात सांगतात की, ‘जेव्हा टॅप कार्यवस्तूमध्ये तुटतो तेव्हा तो बाहेर काढण्यासाठी प्रामुख्याने या मशिनचा उपयोग होतो. या मशिनमुळे कुठल्याही प्रकारच्या कार्यवस्तू खराब न होता टॅप काढणे सहज शक्य होते. त्याबरोबरच आम्ही एक पोर्टेबल मशिनसुद्धा घेतलेले आहे. आमच्या सगळ्या प्लांटमधील सर्व यंत्रभाग या एकाच मशिनवर दुरुस्त केले जातात.
आमच्याकडील कार्यवस्तुंची किंमत जास्त असल्याने एक टॅप तुटल्यामुळे कार्यवस्तू टाकून देणे परवडत नाही. त्याचप्रमाणे नवीन कार्यवस्तू बनविणेसुद्धा वेळेच्या दृष्टीने सयुक्तिक नाही. त्यामुळे कार्यवस्तुचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ न देता टॅप काढण्याला फारच महत्त्व प्राप्त झाले आहे. आमच्याकडे 1.5’ (M 40) पर्यंतचे टॅप काढण्यासाठी हे मशिन वापरले जाते.
जर कार्यवस्तूवरील टॅप तुटलेले भोक तिरके असेल तर टिल्टिंग हेडचा वापर करून भोक आणि इलेक्ट्रोड एका रेषेत आणले जातात. टेबल हलवूनसुद्धा समायोजन करता येते. अर्थात हे त्यावेळच्या परिस्थितीनुरूप ठरविले जाते. कार्यवस्तूमधील आधी केलेले थ्रेड खराब होत नाहीत कारण कडेचे थोडे मटेरियल ठेवून आतील टूलचे सर्व मटेरियल जाळून काढले जाते. पोर्टेबल मशिन मोठ्या कार्यवस्तूवर काम करण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी त्याला मॅग्नेटिक बेस दिलेला आहे आणि त्यामुळे मशिन कार्यवस्तूवर घट्ट बसते. साधारणपणे आठवड्याला 1 ते 2 कार्यवस्तू या कामासाठी येतात.
शैलेश पटवर्धन
स्पार्कोनिक्स (इंडिया) प्रा. लि. या कंपनीचे संचालक आहेत.
9822094669
shailesh@sparkonix.com